रोहित वेमुलाने वैयक्तिक कारणामुळेच आत्महत्या केली : चौकशी समितीचा अहवाल

Aug 16 2017 7:00PM
नवी दिल्ली : रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचा अहवाल न्यायालयीन चौकशी समितीकडून सादर करण्यात आला आहे. या अहवालाआधारे, हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला याने वैयक्तिक कारवामुळे आत्महत्या केली होती, तसेच तो दलितही नव्हता अशी माहिती समोर आली आहे. या शिवाय, रोहित वेमुला याला आणि त्याच्या मित्रांना वसतिगृहातून काढून टाकल्याने तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला, यामध्येही तथ्य नसल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालामध्ये, तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि भाजप नेते बंडारू दत्तात्रेय यांनाही क्लीन चीट देण्यात आली आहे. स्थानिक आमदार रामचंद्र राव, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि स्मृती इराणी हे केवळ आपली जबाबदारी पार पाडत होते. त्यांनी विद्यापीठ प्रशासनावर कोणताही दबाब आणला नाही, असेही अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, रोहित वेमुला याला अनेक आजारांनी ग्रासले होते, तसेच अनेक कारणांमुळे तो नाराज होता. त्याला स्वतःच्या अनेक समस्या होत्या आणि जगातील अनेक घडामोडींवर तो नाराज होता हे रोहित वेमुला याच्या सुसाइड नोटमधून हे स्पष्ट होते. त्याने सुसाइड नोटमध्ये आत्महत्येसाठी कोणालाही दोषी ठरवले नव्हते. तो विद्यापीठाच्या निर्णयावर नाराज असता तर त्याविषयी त्याने स्पष्टपणे लिहिले असते. पण त्याने तसे काहीही केलेले नाही. यामुळे हे स्पष्ट होते की, विद्यापीठाची तत्कालीन परिस्थिती रोहितच्या आत्महत्येला कारणीभूत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तो बालपणापासू एकटाच होता. त्याचे कधी कोणी कौतुक केले नाही. यामुळेही तो निराश होता, असेही अहवालाद नमूद करण्यात आले आहे. रोहित वेमुला याने 17 जानेवारी 2016 रोजी वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली होती. परंतु, त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात मोठे आंदोलन पेटले होते. रोहित वेमुला दलित असल्यामुळे त्याला विद्यापीठातून काढून टाकण्यात आले आणि याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने एक सदस्यीय समिती नेमली होती.