कात्रज तलावाची दुरावस्था

Aug 17 2017 9:10PM
पुणे : पुण्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात येत असताना कात्रज येथील नानासाहेब पेशवे उद्यानाची दुरवस्था झाली आहे. म्युझिक फाऊंटन गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. एकेकाळी पिण्यासाठी वापर होत असलेल्या तलावाच्या पाण्याला आता दुर्गंधी येत आहे. पंधरा दिवसांपासून उद्यानात झाडण कामाच करण्यात आलेले नाही. महापालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्यामुळेच उद्यानाची ही दुरवस्था झाली असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. जेएनएनयूआरएम प्रकल्पाअंतर्गत आणि महापालिकेच्या तरतुदीमधून याठिकाणी 10ते 12 कोटी रुपये खर्च करून नानासाहेब पेशवे तलाव आणि उद्यानाचा विकास करण्यात आला. 17 एकर परिसरामध्ये उद्यान आणि तलाव आहे. तर फुलराणी, आजीआजोबा उद्यान असा एकूण 29 एकरचा हा परिसर अतिशय पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षणाचे ठिकाण आहे. जवळच राजीव गांधी उद्यान असल्यामुळे याठिकाणी फुलराणी आणि तलाव पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची दररोज गर्दी असते. याठिकाणी पेशवेकालीन तलाव आहे. एकेकाळी या तलावाचे पाणी शहराला पिण्यासाठी वापरले जात असे. शनिवारवाड्याला सुध्दा कात्रज तलावातून पाणी येत असे. त्यामुळे ऐतिहासिक अशा तलावाची दुरवस्था आली आहे. काही वर्षांपूर्वी जेएनएनयूआरएमच्या निधीतून या तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले. या कामाची केंद्र सरकारने सुध्दा दखल घेतली होती. मात्र काही दिवसात हा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेला आहे. भिलारेवाडी आणि मांगडेवाडी या गावामधील मैलापणी या तलावाच्या पाण्यात मिसळत असल्यामुळे दुर्गंधी येत आहे, कात्रज घाटामध्ये पडणाऱ्या पावसाचे पाणी प्रामुख्याने या तलावात येत असते. याभागात वस्ती वाढल्यामुळे कात्रज तलाव धोक्यात आला आहे. महापालिका प्रशासनाकडून यादृष्टीने कोणतीच उपाययोजना होताना दिसत नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये तलावामध्ये ज्या ओढ्यातून पाणी येत असते. याठिकाणी प्रचंड कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. तलावाच्या मध्यभागी एक एकरामध्ये लॉन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. येथील विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधते. सुमारे 2 कोटी रुपये खर्च करुन पाटील वाडा बांधण्यात आला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी असणाऱ्या भागाकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. उद्यानामध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट पसरलेला आहे. भटकी कुत्री याठिकाणी मोठ्याप्रमाणात येत असल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. गेल्या पंधरा दिवसांपासून उद्यानामधील झाडण काम झालेले नाही. पूर्वीच्या ठेकेदाराची मुदत संपली असल्यामुळे नवीन ठेका मिळेपर्यंत उद्यानाची साफसफाईच बंद आहे. त्यामुळे कचऱ्यामधूनच नागरिकांना चालावे लागत आहे. कात्रज परिसरामध्ये हे सर्वात मोठे उद्यान आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. उद्यानामध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र ओपन जिम आहे. पुरुषांची जिम ही नगरसेवक वसंत मोरे यांनी स्वत:च्या खर्चातून सुरु केली आहे. तर महिलांसाठी असलेली जिम सीएसआर फंडातून एका कंपनीने उभारलेली आहे. आता पुरुषांसाठी असलेल्या जिमची दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील साहित्य खराब झाले आहे. असे असताना याकडे लक्ष देण्यास ना महापालिका प्रशासन तयार आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी. त्यामुळे दुरवस्था झालेल्या जिममध्ये नागरिकांना व्यायाम करावा लागत आहे. ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत सर्वच नागरिक जिमचा उपयोग करतात. अनेक वेळा तक्रारी करुन सुध्दा कोणीच दखल घेत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ------------------------------ उद्यानात 15 दिवसांपासून झाडण काम नाही चौकट: कात्रज तलावाच्या परिसरात एकूण 22 कामगार ठेकेदारी पध्दतीने काम करत आहेत. उद्यान विभागाला यासाठी वर्षाला 25 लाख रुपये खर्च येतो. यावर्षी केवळ 12 लाख रुपयांची तरतूद उद्यान विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी काम करणाऱ्या सेवकांपैकी निम्मे सेवक कमी करावे लागणार आहेत. त्यामुळे 29 एकरामध्ये पसरलेल्या या भागाची स्वच्छता कशी राखणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. संपूर्ण परिसरासाठी केवळ दोनच सुरक्षा रक्षक याठिकाणी नेमण्यात आले आहेत. ------------------------------- झेंडा आणि फुलराणी यांच्या देखभालीची समस्या राज्यातील सर्वात उंच असा ध्वज याठिकाणी बसवण्यात आला आहे. येत्या 15 ऑगस्टला झेंड्याची देखभाल दुरुस्ती जबाबदारी ठेकेदाराची संपली आहे. त्यामुळे आता नव्याने देखभालीसाठी निविदा मागवाव्या लागणार आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी याठिकाणी असणाऱ्या फुलराणीमध्ये बिघाड झाला. याच्या दुरुस्ती करण्यात आली असून ठेकेदाराला अद्याप बिलच अदा करण्यात आले नाही. अतिशय सुंदर असणाऱ्या या परिसराच्या देखभाल दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला असल्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तलावाच्या दारात मोठ्या संख्यने अतिक्रमण वाढत असून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ------------------------------ 5 कोटी रुपये खर्च करून उभारलेले कारंजे बंद पुण्यात तलावामध्ये उभारण्यात आलेले एकमेव करंजे नानासाहेव पेशवे उद्यानात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे कारंजे विविध कारणासाठी बंद ठेवण्यात आले आहे. आता तर कारंज्याचे काही साहित्य तलावाच्या बाहेर काढून ठेवण्यात आले असल्यामुळे हे कारंजे सुरू होणार का असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत.