उच्च क्षमता वर्तुळाकार मार्गाला मान्यता

Aug 23 2017 10:11PM
पुणे : पुण्यात सर्वाधिक चर्चेचा विषय बनलेल्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाला (एचसीएमटीआर) शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्य सभेच्या मान्यतेनंतर प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल. साधारणतः 36 किलोमीटरचा हा मार्ग उन्नत (एलेव्हेटेड) असणार असून यासाठी 6 हजार 646 कोटी खर्च अपेक्षित आहे. शहरातील सार्वजनिक वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी एचसीएमटीआरची आवश्यकता होती. आगामी 2041 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन, या रस्त्याची आखणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा रस्ता सहा पदरी असणार असून, दुचाकीला रस्त्यावर परवानगी नसणार आहे. या मार्गावर ताशी 50 किलोमीटर वेगाने वाहने चालवता येईल. महापालिकेच्या 1987 च्या विकास आराखड्यात (डीपी) "एचसीएमटीआर प्रस्तावित करण्यात आला होता. नियोजित मार्गांच्या पाहणीचे कामही झाले होते. परंतु, प्रस्ताव रखडला होता. त्यासाठी नगरसेवक आबा बागूल यांनी अनेकवेळा आंदोलने केली. अखेर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शहर सुधारणा समितीसमोर प्रस्ताव ठेवला आणि त्याला मंजुरी मिळाली. शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत म्हणाले, शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी एचसीएमटीआर रस्ता उपयुक्त आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर कसे सुरू करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर्व ठिकाणी भाजपची सत्ता असल्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी अडचण येणार नाही, असे सांगितले.