आकाशवाणीच्या बातमीपत्राला संपाचा फटका

Aug 23 2017 10:13PM
पुणे ः आकाशवाणी मुंबई केंद्रातील वृत्त निवेदकांनी वेतन न मिळाल्याने संप केला. त्यामुळे बुधवारी सकाळी 8.30 वाजता बातम्या प्रसारित झाल्या नाहीत. आकाशवाणीच्या इतिहासातील राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित न होण्याची बहुधा ही प्रथमच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र अनेक वर्षे दिल्ली आकाशवाणीवरून प्रसारित होत होते. मात्र, खर्च कपातीचे कारण देत दिल्ली आकाशवाणीवरून प्रसारित होणारी बातमीपत्र राज्यांच्या राजधानीत हलवण्यात आली आहे. त्यानुसार, दिल्लीच्या आकाशवाणीच्या मराठी वृत्त विभागातून प्रसारित होणारी तीन बातमीपत्रे मुंबईहून सकाळी 8.30, दुपारी 1.30 व रात्री 8 च्या बातमीपत्रे प्रसारित होत. पूर्वी, पुणे आकाशवाणी केंद्रावरून ही राष्ट्रीय बातमीपत्र प्रायोजकत्व घेऊन प्रसारित व्हायची. याद्वारे शासनाला चार कोटींचा महसूलदेखील मिळायचा. मात्र, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही बातमीपत्रे मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठीची आमच्याकडे सुविधा उपलब्ध नाही, असे सांगूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, ही बातमीपत्र मुंबईवरून प्रसारित होत आहेत. तर दुसरीकडे, सकाळचे 8.30 वाजताचे बातमीपत्र पुणे आकाशवाणी केंद्र प्रसारित करायला तयार आहे, ते आम्हाला देण्यात यावे, अशी मागणी पुणे केंद्राने केली आहे.