नगरविकास खाते भुक्कड काही कामाचे नाही - गडकरी

Aug 27 2017 6:26PM
पुणे : राज्याचे नगरविकास खाते काही कामाचे नाही. त्यांना नियोजन करायला 20 वर्षे लागतात. यापेक्षा खासगी संस्थेकडून नियोजन आराखडा करून रस्ते-पुलांची कामे करणे अधिक सोयीचे आहे. असा भुक्कड विभाग मी आयुष्यात कधीही पाहिली नाही, असा टोला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी मुख्यंमत्र्यांच्या नगर विकास खात्याला लगावला. पुणे शहराचे पश्चिम प्रवेशद्वार असणाऱ्या चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व अपघाताच्या घटना रोखण्यासाठी प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर सौ. मुक्ता शेलैश टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, विजय शिवतरे, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, बाळा भेगडे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि महापालिकेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, पुणे शहर प्रदुषणाच्या बाबतीत ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. त्यामुळे रस्तेबांधणीऐवजी जलमार्गाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. देशातील जवळपास 111 नद्यांमध्ये जलमार्ग विकसित करण्यात येत. या विधेयकात मुळा-मुठेचा समावेश व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. त्यानुसार मुळा-मुठा नदीचा विकास करून त्यामध्ये 35 ते 40 बंदरे बांधल्यास पुणेकर जलमार्गाचा वापर करतील आणि रस्त्यांवरील गर्दी कमी होईल. प्रदूषण आणि किंमतीचा विचार करता जलमार्गास सर्वात स्वस्त आहे. त्यासाठी 20 पैसे खर्च येतो, कोळशापासून तयार केलेल्या मिथेनॉलवर जलवाहतुकीची जहाजे चालविली जाणार आहेत. त्यामुळे इंधनखर्च आणखी वाचणार आहे. त्यामुळे जलमार्गाचा मोठ्या प्रमाणात केला जावा असेही गडकरींनी यांनी नमूद केले.