ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचे निधन

Sep 2 2017 7:53PM
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै (वय 88) यांचे शनिवार वृद्धापकाळाने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. शिरीष पै या आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या. शिरीष पै यांनी कथा, कविता, नाटक, ललित लेखन अशा सर्व प्रकारच्या साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले. कारकिर्दीच्या सुरवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या मराठा मध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. शिरीष पै यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1929 रोजी झाला. यांचे "एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी कवितेत जपानी हायकू हा प्रकार रूजविण्याचे श्रेय शिरीष पै यांना जाते. त्यांच्या एका पावसाळ्यात या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचे केशवसुत पारितोषिक तर हायकू या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. वडील आचार्य अत्रे यांच्याकडून त्यांना लेखनाचा वारसा मिळाला. मुंबईला लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना त्या नवयुगच्या कार्यालयात जाऊन बसायच्या. त्या वेळी नवयुगमध्ये प्रसिद्ध लेखिका शांताबाई शेळके आचार्य अत्रे यांना मदत करायच्या. काही कारणांमुळे शांताबाईंनी नवयुग सोडल्यानंतर शिरिष पै यांनीच ती जबाबदारी स्विकारली. पुढे 1956 ते 1960 यादरम्यान नवयुग साप्ताहिक आणि त्यानंतर 1961 ते 1969 दैनिक मराठा वाड्‌मयीन पुरवणी आणि 1969 ते 1976 मध्ये दैनिक मराठाचे संपादन केले.