निर्मला सीतारामन संरक्षण मंत्री; पीयूष गोयल सांभाळणार रेल्वे

Sep 3 2017 10:02PM
निर्मला सीतारामन संरक्षण मंत्री; पीयूष गोयल सांभाळणार रेल्वे नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मंत्रिमंडळाचा फेरबदलासह विस्तार केला. यामध्ये चार राज्यमंत्र्यांना बढती देण्यात आली, तर 9 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये चार नोकरशहा आहेत. आता मंत्रिमंडळाची संख्या 75 वर पोहोचली आहे. यामध्ये 27 कॅबिनेट, तर 11 राज्यमंत्री आहेत. तर 37 मंत्र्यांकडे स्वतंत्र मंत्रालयाचा कारभार आहे. शपथविधी सोहळ्यानंतर लागलीच फेरबदल आणि खातेवाटप जाहीर झाले. मोदींचे धक्कातंत्र याहीवेळेस पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात महत्त्वाच्या अशा संरक्षण मंत्रालयाचा कारभार निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपविला आहे. सीतारामन ह्या इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या. संरक्षण मंत्री या नात्याने सीतारामन यांचा निर्णायक कॅबिनेट मंत्र्यांच्या समितीमध्ये प्रवेश झाला आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि केंद्रीय अर्थ मंत्री या समितीचे सदस्य असतात. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघातांच्या मालिकांमुळे चर्चेत सुरेश प्रभू चर्चेत होते. आता प्रभू यांच्या जागी पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय सोपविण्यात आले आहे. तर प्रभूंकडे व्यवसाय खाते सोपविण्यात आले आहे. जलसंधारण, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन खात्याची सूत्रे उमा भारती यांच्याकडून काढून घेण्यात आली आहेत. नितीन गडकरी आता या खात्यांची धुरा सांभाळतील. तर भारती स्वच्छता आणि पेय जल मंत्रालय सांभाळणार आहेत. धर्मेश प्रधान यांना कौशल्य विकास खात्याचा कारभार सोपविण्यात आला आहे. तो राजीव प्रताप रुडी यांच्याकडे होता. हरदीप पूरी या माजी प्रशासकीय अधिकाऱ्याकडे निवास आणि शहर विकासाची जबाबदारी सोपविण्यात आली. माजी आयएएस अधिकारी अल्फॉन्स हे पर्यटन खाते सांभाळतील. आर. के. सिंह यांच्याकडे ऊर्जा मंत्रालयाचा पदभार सोपविण्यात आला आहे. राज्यवर्धन सिंह राठोड यांची नेमणूक विजय गोयल यांच्या जागी करण्यात आली आहे. आता ते क्रीडा खात्याचा कारभार बघणार आहेत. तर विजय गोयल हे आता संसदीय कामकाज राज्यमंत्री असतील. शिवप्रताप शुक्ला आणि अनंत हेगडे यांच्याकडे अनुक्रमे अर्थ आणि कौशल्य विकासाचे राज्य मंत्रिपद सोपविण्यात आले आहे. तर गजेंद्रसिंह शेखावत कृषी राज्यमंत्री पदाची धुरा वाहतील. नरेंद्र तोमर हे ग्रामीण विकास आणि पंचायत विकास मंत्री असतील.