नोटाबंदी फसली ः रघुराम राजन

Sep 3 2017 10:04PM
नोटाबंदी फसली ः रघुराम राजन नवी दिल्ली ः नोटाबंदी यशस्वी झाली असे ठामपणे कुणीही म्हणू शकत नाही. नोटाबंदीच्या निर्णयामागील सरकारचा उद्देश चांगला होता. मात्र, त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असे परखड मत रिझर्व बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे. नोटांबदीमुळे होणाऱ्या दीर्घकालीन फायद्यापेक्षा नजीकच्या काळात होणारे नुकसान मोठे असेल असे मी सरकारला सांगितले होते. तसेच, काही पर्यायही सुचवले होेते, असेही ते म्हणाले. मी सरकारला नोटांबदी न करण्याचा तोंडी सल्ला दिला होता. तरही सरकारने नोटाबंदी केलीच, तर ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलावी लागतील, त्यासाठी किती वेळ लागेल याबद्दल आरबीआयने सरकारला एक सविस्तर टीपणही पाठवले होते. पुरेशी तयारी नसेल तर काय दुष्परिणाम होऊ शकतात याबद्दलही सरकारला सावध केले होते, असेही राजन म्हणाले. दरम्यान, नोटाबंदीनंतर बॅंकांकडे किती जुन्या नोटा जमा झाल्या, याबाबत रिझर्व बॅंकेच्या वार्षिक अहवालात नुकतीच माहिती देण्यात आली. त्यानुसार, नोव्हेंबरमधील नोटाबंदीनंतर बाद नोटांपैकी 99 टक्के नोटा बॅंकांमध्ये परत आल्या. केवळ एक हजारांच्या 8.9 कोटी इतक्या नोटा बॅंकांमध्ये परत आल्या नाहीत. नोटाबंदीपूर्वी अर्थव्यवस्थेत 612.6 कोटी इतक्या रकमेच्या एक हजारांच्या नोटा चलनात होत्या. याचा अर्थ यापैकी 1.3 टक्के नोटा बॅंकांकडे परतल्या नाहीत. ------------- एडीएचा मृत्यू ः शिवसेनेचे टीकास्त्र नवी दिल्ली ः मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि संयुक्त जनता दलाचा समावेश असेल, असे बोलले जात होते. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात सेना अथवा जेडीयूला कोणतेही स्थान मिळाले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांत प्रचंड नाराजी असून, त्यांनी आपली ती उघडपणे बोलूनही दाखवली आहे. आधीच नाराज असलेल्या शिवसेनेने प्रचंड संताप व्यक्त केला असून भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात, एनडीए ही फक्त कागदावर आणि बैठकांपुरती उरली आहे. प्रत्यक्षात एनडीएचा मृत्यूच झाला आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेचा एकही प्रतिनिधी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हता. त्यामुळे शिवसेनेने शपथविधीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा रंगली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही चर्चा फेटाळून लावली. हा भाजपचा विस्तार होता. ते उत्सव करतील. पेढे वाटतील. आमचा का संबंध? आम्ही कशाला बहिष्कार टाकू, असा प्रतिसवालही त्यांनी केला.