गर्दीचा महापूर!

Sep 3 2017 10:06PM
पुणे : गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी रविवारी शहरात गर्दीचा अक्षरशः महापूर लोटला! मध्यवर्ती भागांसह पेठांमध्ये जिकडे पहावे तिकडे भाविकच भाविक दिसत होते. देखावे पाहण्याचा असलेला अखेरचा दिवस, त्यातही पावसाने घेतलेली विश्रांती आणि जोडीला आलेला रविवारच्या सुट्टीचा योग, याची भाविकांनी चांगलीच संधी साधली. दुपारपासूनच दर्शनासाठी बाहेर पडलेला भाविक आणि सायंकाळी देखावे पाहण्यासाठी लोकांनी केलेली गर्दी उत्तरोत्तर वाढतच गेली. मध्यरात्र उलटून गेली तरी लोकांचा उत्साह काही कमी होताना दिसत नव्हता. उलट तो वाढतच होता. पुण्यातील गणेशोत्सव राज्यासह संपूर्ण देशभरातील नागरिकांचे आकर्षण बनला आहे. सामाजिक, ऐतिहासिक आणि जिवंत देखावे पाहण्यासाठी राज्यभरातून, तसेच परदेशातूनही मंडळी पुण्यात येतात. त्यातच, यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सव वर्ष! त्यामुळे उत्साहाला कार्यकर्त्यांचे उधाण आले आहे. सर्वच मंडळांनी आकर्षक देखावे केले आहेत. विद्युत रोषणाईने शहरातील रस्ते झगमगत आहेत. भक्तांचे स्वागत करणारे फलक आणि स्वागत कमानी शहराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. शहरातील वातावरण मंगलमय झाले असून, सर्वत्र आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत आहे. सहपरिवार देखावे पाहण्यासाठी काल मोठ्या प्रमाणात भाविकगण बाहेर पडले आहेत. त्यात बाहेरगावच्या गणेशभक्तांचा मोठा समावेश होता. सुट्टीचा योग साधून नोकरदारवर्गाने देखावे पाहण्याचे नियोजन केल्याचे दिसून आले. सहकुटुंब जेवणाचा बाहेरच बेत करण्यात आला होता. विशेष म्हणजे, काहीजण खास पारंपरिक वेशामध्ये देखावे पाहण्यासाठी बाहेर पडले होते. लहान थोरांसह देखावे पाहण्याचा आनंद नागरिकांनी लुटला. शहरातील पेठांमध्ये मानाचे आणि गणेशोत्सवाचे आकर्षण असलेले गणपती असल्यामुळे मोठी गर्दी होती. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर, रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव, शिवाजी, कर्वे रस्त्यावरील देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. मानाच्या पाचही गणपतींचे गणेशभक्त आवर्जून दर्शन घेताना दिसले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबू गेणू मंडळ, अखिल मंडई गणपती मंडळ, राजाराम मंडळाचे देखावे पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. विद्युत रोषणाई, जिवंत देखावे, कारंज्यांचे देखावे आणि पौराणिक देखावे हे पुणे शहरातील गणेशोत्सवाचे आकर्षण असते. यावर्षी सुध्दा अशाच प्रकारचे देखावे शहरामध्ये साकारण्यात आले होते. गणपती बाप्पा मोरया, असा जयघोष करत मंडळी रस्त्यावर वावरत होती. महाविद्यालयातील तरुण-तरुणी ग्रुपने गणपती पाहण्यासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. कामानिमित्त व्यस्त असणारी मंडळी सुध्दा गणपती पाहण्यासाठी एकत्र भेटली. अनेक गणेश मंडळांना राजकीय, सांस्कृतिक, चित्रपट क्षेत्रातील मंडळींनी भेटी दिल्या.