दोन सख्ख्या भावंडांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू गणपती विसर्जन दरम्यानची घटना

Sep 6 2017 4:04PM
हडपसर - (प्रतिनिधी) वडकी येथील गायदरा तलावांमध्ये दोन सख्ख्या भावंडांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोहित सतीश जगताप ( वय १३) व ओमकार सतीश जगताप (वय ९) ही दोन सख्खी भावंडे (वडकी, १० वा मेैल ) येथे राहत होते. ते गणेश विसर्जनासाठी तलावांमध्ये गेले होते. परिसरातील त्याच्या बरोबरीचे काही मित्र या ठिकाणी गेले होते. विसर्जनाला गेलेल्या मुलांपैकी पाच मुले त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यामध्ये पडली होती. त्यापैकी तीन मुलांना तेथील स्थानिक नागरिकांनी तात्काळ पाण्याबाहेर काढले. दरम्यान रोहित व ओमकार या दोन्ही भावंडांचा गणेश विसर्जन करीत असताना तलावामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अशी माहिती बचाव कार्यामध्ये सहभागी असलेले भगतसिंग ग्रुपचे बच्चूसिंग टाक यांनी दिलेली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मात मयत नोंद करण्यात आलेली आहे. वडकीनाला येथून कानिफनाथगडा कडे जाणाऱ्या मार्गावर कानिफनाथ पायथ्याला हा तलाव आहे. हडपसर येथील बच्चूसिंग टाक व आझादसिंग टाक, अग्निशामक दल, लोणी काळभोर पोलीस पोलीस उप निरीक्षक राजू महानोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवली होती.