अपार उत्साहात गणरायाला निरोप

Sep 6 2017 8:58PM
पुणे ः वरुण राजाने घेतलेली विश्रांती आणि गणेश भक्तांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह, ढोल-ताशांचा उत्तरोत्तर शिगेला पोहचलेला आवाज, डिजेच्या तालावर थिरकणारी तरूणाई, रंगी बेरंगी फुलांनी सजविलेले रथ, आकर्षक विद्युत रोषणाई, "श्रीं ची मूर्ती दृष्टीपथास पडताच भक्तीभावाने आपोआप जोडले जाणारे हात आणि बाप्पा मोरयाच्या अखंड जयघोषात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाची वैभवशाली मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि शांततेत निर्विघ्न पार पडली. यंदाची मिरवणूक 28 तास 5 मिनीटे चालली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 मिनीटे आधी मिरवणूक संपली. मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणेश मूर्तीचे पांचाळेश्वर घाटावरील हौदात सायंकाळी 7 वाजून 28 मिनीटांनी विसर्जन झाले. बुधवारी सकाळी 10.10 मिनिटांनी महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याला महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरूवात झाली. मानाच्या पाच गणपतीच्या विसर्जनासाठी 9 तास 10 मिनीटांचा कालावधी लागला. गुरूवारी दुपारी 2.20 वाजता नटेश्वर घाटावर भवानी पेठेतील गोपाळ वस्ताद तालीम तरूण मंडळ ट्रस्टच्या मूर्ती विसर्जनाने मिरवणुकीची सांगता झाली.