काबूल हादरले; विमानतळावर रॉकेट हल्ला

Sep 27 2017 7:44PM
काबूल ः अफगाणिस्तानची राजधानी काबूल रॉकेट हल्ल्यांनी हादरून गेली. काबूल येथील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 20 ते 30 रॉकेट डागण्यात आले. या हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हे विमानतळ तत्काळ खाली करण्यात आले, तसेच सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच, कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. विशेष म्हणजे, अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांचे काबूल विमानतळावर आगमन झाल्यानंतर काहीवेळातच हा प्रकार घडला. मॅटिस यांचा हा दौरा पूर्वनियोजित नव्हता. भारतभेटीनंतर ते अचानक अफगाणिस्तानमध्ये दाखल झाले. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, तालिबानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस आमचे लक्ष्य होते, असेही तालिबानने म्हटले आहे. स्थानिक वाहिनी "टोलो ने दिलेल्या वृत्तानुसार, विमानतळावर किमान 20 ते 30 रॉकेट डागण्यात आले. विमानतळ परिसरातच "नाटो चा लष्करी तळ आहे. तेदेखील हल्लेखोरांचे लक्ष्य असू शकते, असे माध्यमांनी म्हटले आहे. रॉकेट हल्ल्यानंतर कानठळ्या बसविणारा मोठा आवाज झाला. त्यानंतर लगेचच गोळीबारही करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले. या हल्ल्यानंतर काबूलच्या सुरक्षा यंत्रणेने तत्काळ विमानतळ रिकामे करत प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविले. त्यानंतर विमानतळावर येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या. अफगाणिस्तानात लष्कर पाठविण्याचे अमेरिकेने नुकतेच आश्वासन दिले होते. त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी अमेरिकेचे संरक्षण मंत्री अफगाणिस्तानात पोहोचल्याचे सांगण्यात यते. दरम्यान, गेल्या मे महिन्यात काबूलच्या भारतीय दूतावास परिसरात शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला होता. या हल्ल्यात 80 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 325 हून अधिक जण जखमी झाले होते. तर मार्चमधील काबूलस्थित अमेरिकी दूतावासाजवळील एका लष्करी रुग्णालयाला लक्ष्य बनविण्यात आले होते. या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला होता. तर आयसिसने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.