रेल्वेच्या प्रत्येक डब्ब्यात लागणार सीसीटीव्ही

Sep 28 2017 4:45PM
नवी दिल्ली ः आता रेल्वेच्या प्रत्येक डब्ब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. इतकेच नव्हे, तर रेल्वे स्टेशन आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवरदेखील सीसीटीव्हीच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाची करडी नजर असणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. याबरोबरच, तिकीट तपासणीस यांनी अधिकृत गणवेशातच तिकीट तपासावेत, अशी सूचनाही गोयल यांनी केली. तिकीट न काढणाऱ्या बेसावध रेल्वे प्रवाशांची धरपकड करण्यासाठी काही वेळा तिकीट तपासणीस साध्या वेशात येतात. मात्र, यापुढे फक्त गणवेशातच तिकीट तपासणीची त्यांना मुभा असेल, असेही गोयल यांनी स्पष्ट केले. गॅंगमनचे अपघात रोखण्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी एक किट तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 1 नोव्हेंबरपासून रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू होणार असून अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळेत घट होणार आहे. पाच हजरांपेक्षा जास्त मानवविरहित रेल्वे फाटक वर्षभराच्या आत बंद केली जाणार आहेत. जास्त पैसे खर्च करावे लागले तरी सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.