आता ऑनलाइन ऑर्डरनंतर घरपोच इंधन

Sep 28 2017 8:36PM
नवी दिल्ली ः आता इंधनासाठी पेट्रोल पंपावर रांगा लावण्याची गरज नाही. तर, घरपोच इंधन मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाईन ऑडर्रची सुविधा सरकार उपलब्ध करून देणार आहे. आता लवकरच ई-कॉमर्सच्या संकेतस्थळावर पेट्रोलियम पदार्थ उपलब्ध होतील, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. यासंदर्भातील आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असल्याचेही प्रधान यांनी सांगितले. सुरूवातीला जेव्हा आपण ही संकल्पना सांगितली, तेव्हा अनेकांनी शंका उपस्थित केली होती. पण, आता ही संकल्पना लवकरच सत्यात उतरणार असल्याचेही प्रधान यांनी सांगितले. पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची संकल्पना धर्मेंद्र प्रधान यांनी सर्वप्रथम संसदेच्या सल्लागार समिती सदस्यांसमोर मांडली होती. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि पेट्रोल पंपांवरील लांब रांगा टाळण्यासाठी ही संकल्पना पेट्रोलियम मंत्रालयाकडून मांडण्यात आली होती.