... तर डिसेंबरपासून क्रांतीला सुरूवात ः अण्णा

Oct 2 2017 8:12PM
नवी दिल्ली ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा सत्याग्रहाचे शस्त्र उपसले आहे. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण नाही केली तर डिसेंबरमध्ये नव्या क्रांतीला सुरूवात करू, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अण्णा हजारे यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी राजघाटावर एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले. यावेळी अण्णांनी हा इशारा दिला. गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने जनतेच्या नव्हे तर केवळ स्वतःच्या फायद्याचे निर्णय घेतले. आज सहा वर्षे झाली तरी लोकपाल कायदा पूर्णपणे अस्तित्वात येऊ शकलेला नाही. उलट, मोदी सरकारने लोकपाल आंदोलनानंतर कायदा कमकुवत करण्याचे काम केले, असा आरोपही अण्णांनी यावेळी केला. मी गेल्या 35 वर्षांपासून आंदोलन करत आहे. ज्यांच्याविरोधात मी आंदोलन केले नाही, असा एकही पक्ष उरलेला नाही. आरटीआय कायदा आम्ही बनवला. त्यामुळे बराच फरक पडला. आता गेल्या सहा वर्षांपासून लोकपालची लढत आहे. पण जनलोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त करण्याबाबत हे सरकार गंभीर नाही. आपल्या या अवस्थेला केवळ भ्रष्टाचारच कारणीभूत असून त्याला रोखण्यासाठी सरकार पावले उचलणार नसतील तर डिेसंबर किंवा जानेवारीत संघर्षासाठी पुन्हा मैदानात उतरेन, असा इशाराही अण्णांनी यावेळी दिला.