गुजरात दंगल : मोदींविरोधातील अर्ज फेटाळला

Oct 5 2017 6:00PM
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलप्रकरणी दिलासा मिळाला आहे. 2002च्या गुजरात दंगलप्रकरणातील मोदींविरोधातील अर्ज गुरूवारी गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. तत्कालीन, मुख्यमंत्री मोदी यांच्यासमवेत अन्य 59 जणांची नव्याने चौकशी व्हावी, अशा मागणीचा अर्ज झाकिया जाफरी आजण सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी उच्च न्यायालयाकडे केला होता. त्याआधी, गुजरात दंगलीचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने नरेंद्र मोदी आणि अन्य 59 जणांना क्लीन चिट दिली होती. तसेच, मोदी यांना एसआयटीने दोषमुक्त केले होते. दंगलीमध्ये मोदी यांचा हात असल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचे एसआयटीने न्यायालयात म्हटले होते. जाफरी, सेटलवाड यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, डिसेंबर 2013 मध्ये स्थानिक न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर, जाफरी यांच्यातर्फे वकील मिहीर देसाई यांनी गुजरात उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान दिले होते. त्यावर, न्यायमूर्ती सोनिया गोकानी यांनी गुजरात दंगल प्रकरणाची नव्याने चौकशी होणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, जाफरी यांचा कारस्थानाचा आरोपही न्यायालयाने फेटाळून लावला. गो्रधा हत्याकांडानंतर 28 फेब्रुवारीला अहमदाबादच्या गलबर्म सोसायटीत दंगल उसळली होती. त्या दंगलीत कॉंग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासमवेत 59 जण मारले गेले होते.